Vaishnavi Hagawane : हगवणे बापलेकाला आश्रय देणाऱ्या पाचही जणांना जामीन ; पुणे कोर्टाचे बावधन पोलिसांवर ताशेरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर पसार झालेला सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून बावधन पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींना पुणे न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी देऊन जामीनही मंजूर केला.

‘गुन्हेगाराला आश्रय देणे हा जामीनपात्र गुन्हा असतानाही आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी पोलिसांनी कोणत्या आधारावर केली. पोलिसांना फक्त अटकेचे अधिकार आहेत का, सरकार पक्षाने जागरूकता दाखवायला नको का,’ अशा कठोर शब्दांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी बावधन पोलिसांवर ताशेरेही ओढले.

या प्रकरणात कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) याच्यासह मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांना मंगळवारी दुपारी शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.

‘अटक आरोपींचे राजेंद्र हगवणेंशी पूर्वीपासून मित्रत्वाचे संबंध असून, त्यांनी वैष्णवीच्या मृत्यूनंतर पळून गेलेल्या राजेंद्र व सुशीलला आश्रय दिला. एकमेकांचे मोबाइल व गाड्या वापरल्या आहेत. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे का, त्यांनी हगवणेंना आर्थिक मदत केली का, याबाबत तपास करायचा आहे,’ असे तपास अधिकारी अनिल विभुते यांनी न्यायालयात सांगितले.

‘राजेंद्र हगवणे व अन्य आरोपी हे प्रभावशाली राजकारणी असून, अटक आरोपींच्या मदतीने साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात; तसेच पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी,’ अशी मागणी तपास अधिकारी विभुते व सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केली. आरोपींच्या वतीने ॲड. सुशीलकुमार पिसे, ॲड. कुंडलिक गावडे, ॲड. सचिन जाधव, ॲड. श्रीकांत पन्हाळे यांनी बाजू मांडली.

‘आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २४९ (ब) (अपराध्याला आसरा देणे) कलम लावण्यात आले असून, ते जामीनपात्र आहे. अशा जामीनपात्र गुन्ह्यात आरोपींना अटक करताना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३१ नुसार नोटीस देण्यात आलेली नाही. मुख्य आरोपींवर लावलेली इतर कलमे या आरोपींना लागू होत नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी व जामीन मंजूर करण्यात यावा,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

दोन्ही बाजू सविस्तरपणे ऐकून घेत न्यायालयाने पाचही आरोपींना प्रथम न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पाचही आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करून पाचही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *