महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनने हजेरी लावल्याने दमदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. मागील काही तासांपासून पुण्यात पावसाचा जोर कमी झाला असून पुढील २४मतासांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यम पाऊस कोसळतो आहे. पुढील २४ तासात पुणे आणि पुणे घाट प्रदेशातील एक दोन ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि आसपासच्या भागात सुरू असलेल्या अविरत पावसाने आठवड्याच्या शेवटी टोक गाठले होते. नाले आणि कालवे फुटल्याने आणि नद्यांची पाणी पातळणी अचानक वाढल्याने घरे, रस्ते पाण्याखाली गेले आणि रहिवासी अडकले. इंदापूर तालुक्यातील ७० गावांमध्ये आणि बारामतीमधील १५० घरांमध्ये पावसाचे पाणी घरात घुसले. बारामतीतील २९ घरांना अंशतः नुकसान झाले
बारामती इंदापूर, आणि दौंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. बारामती मे महिन्यात पावसाने मागील ५५ वर्षांचा विक्रम मोडला. बारामतीमधील काटेवाडीत घरात पाणी घुसल्याने एकाच कुटुंबातील ७ लोक अडकले होते, त्यांनी अधिकाऱ्यांनी सुरक्षितपणे वाचवले. कालव्यांना भगदाड पडल्यामुळे अनेक सखल भागातील घरांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते,असे एनडीआरएफने एका निवेदनात म्हटले आहे. कऱ्हा नदी (बारामती) आणि नीरा नदी (इंदापूर) मध्ये वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.