महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०४ टक्क्यांहून अधिक) पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के (त्रुटी कमी- अधिक चार टक्के) पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे. राज्याच्या चार हवामानशास्त्रीय उपविभागांमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
हवामान विभागाचा सुधारित पावसाचा अंदाज
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अद्ययावत दीर्घकालीन अंदाज मंगळवारी दिल्ली येथून ‘हायब्रीड’ स्वरूपात जाहीर करण्यात आला. या वेळी मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा उपस्थित होते. एप्रिलमधील पहिल्या टप्प्यातील अंदाजात आयएमडीने यंदा सरासरीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यात सुधार करून आता सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे. मान्सून काळातील पावसाची राष्ट्रीय सरासरी ८७० मिलीमीटर आहे.
देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त
अंदाजाबाबत डॉ. महापात्रा म्हणाले, ‘यंदा मान्सूनवर प्रभाव टाकणारे एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हे घटक मान्सून हंगामात तटस्थ (न्यूट्रल) राहण्याची शक्यता असल्याने यंदा हंगामी पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. लडाख, बिहार आणि ईशान्य भारतातील राज्ये वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल. यंदा देशभरात सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता ८९ टक्के आहे.’
जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
‘आयएमडी’च्या सुधारित अंदाजानुसार, मध्य आणि दक्षिण भारतात आगामी मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त, वायव्य भारतात सर्वसाधारण, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मान्सून कोअर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडिशा ते राजस्थानपर्यंतच्या मध्य भारतातील खरिपाच्या क्षेत्रात यावर्षीही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये देशात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे.