महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। उन्हाळा असो की पावसाळा, यात सामान्यांना सुखरूप घरापर्यंत पोचविणारी ‘लालपरी’ मुसळधार पावसातही सेवा बजावत आहे. दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असताना देखील ‘लालपरी’ने एक कोटी नऊ लाख किलोमीटर प्रवास केला आहे. ८३ लाख प्रवाशांनी दोन दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १४ हजार ३४१ बसगाड्यांमधून प्रवास केला आहे. त्यातून महामंडळाला ६३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या साडेचौदा हजार बसगाड्या आहेत. मागील आठ-दहा दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे महामार्गांवरील वाहनांचा वेग कमी झाला असून गर्दीमुळे प्रवासाला विलंब होत आहे. अशा स्थितीत देखील लालपरी आपल्या प्रवाशांना घरापर्यंत सुखरूप पोचवत आहे. २६ मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी मागील ५० वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला.
तरीसुद्धा लालपरीने ५६ लाख २० हजार किलोमीटरचा प्रवास करून ४२ लाख २३ हजार प्रवाशांना सेवा दिली आहे. त्यातून महामंडळाला ३२ कोटी दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आज देखील ४२ लाख प्रवाशांना सेवा देत ३१ कोटींचे उत्पन्न कमावले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने बसगाड्यांच्या खिडक्यांच्या काचा दुरुस्त केल्या असून पाणी बसमध्ये येणार नाही, यादृष्टीने कामे करून घेतली आहेत.
बस चालकांना सूचना
रस्ता स्पष्ट दिसत नसल्यास बस पुढे नेऊ नये
पुलावरून जाताना बाजूचे सगळे कठडे दिसत असतील तरच बस पुढे न्यावी
गाडी चालविताना मोबाईलवर कोणीही बोलू नये, पावसात वायपरचा वापर करावा
जेथे दरड, झाडे कोसळतील अशी शक्यता आहे, अशा मार्गावरून जाताना गाडीचा वेग मर्यादित असावा
एसटी गाड्यांची वाहतूक सुरळीत
राज्यातील पावसाचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. चालक-वाहकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून त्यात पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता पूर्ण दिसेपर्यंत बस पुढे न्यायची नाही, अशा सूचना आहेत.
– ज्ञानेश्वर रणवरे, विभाग नियंत्रक, मुंबई