महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। आयकर विभागाने वर्ष २०२५-२६ साठी आयकर विवरणपत्र (रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ‘एक्स’वर प्रेस रीलिज करून याची माहिती दिली आहे. करदात्यांना कागदपत्रे गोळा करणे आणि मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांमधील बदलांशी जुळवून घेणे शक्य व्हावे, यासाठी आयकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करणे, पारदर्शकता वाढवणे या उद्देशाने मुदतवाढ देण्यात आली आहे. या बदलांसाठी सिस्टीम डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि संबंधित युटिलिटीजच्या चाचणीसाठी अतिरिक्त वेळ आवश्यक आहे, असे सीबीटीडीने म्हटले आहे.
शिवाय, ३१ मे २०२५ पर्यंत दाखल करावयाच्या टीडीएस विवरणांमधून उद्भवणारे क्रेडिट जूनच्या सुरुवातीला दिसून येतील, ज्यामुळे अशी मुदतवाढ न मिळाल्यास रिटर्न भरण्याचा प्रभावी कालावधी मर्यादित होईल. सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्या ई-फायलिंग टूल्स काम करत नाहीत. त्यामुळे आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत दीड महिन्याने वाढविण्यात आली आहे.