महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २६ ऑगस्ट – कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 75 टक्क्यांवर गेला ही समाधानाची बाब असली तरी संसर्गाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. अवघ्या गेल्या १६ दिवसांत देशात रुग्णसंख्या 10 लाखांवर वाढली आहे. तरुण किंवा वृद्धांमुळे नाही, तर मास्क न वापरणाNया बेजबाबदार लोकांमुळेच देशाची वाट लागली आहे. यासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चिंता व्यक्त केली आहे.
‘अनलॉक-3’ 31 ऑगस्टला संपणार असून, त्यानंतरच्या अनलॉक-4च्या गाईडलाईन्स केंद्र सरकार लवकरच जाहीर करेल. मात्र, ‘आयसीएमआर’च्या डाटानुसार ‘अनलॉक’मध्ये रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यासंदर्भात ‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले, तरुणांमुळे किंवा वृद्धांमुळे नाही, तर केवळ बेजबाबदार आणि काळजी न घेणारे लोक जे मास्क वापरत नाहीत त्यांच्यामुळेच देशात कोरोना महामारीचा संसर्ग होत आहे. 24 तासांत रुग्ण बरे होण्याची संख्या 66,550 आहे. रिकव्हरी रेट 75.92 टक्क्यांवर गेला आहे.
