अभिनेता संजय दत्तला अमेरिकेचा व्हिसा मिळाला ; उपचारासाठी लवकरच होणार रवाना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २६ ऑगस्ट – कॅन्सरग्रस्त अभिनेता संजय दत्तला अमेरिकेचा व्हिसा मिळाला असून तो लवकरच उपचारासाठी तिथे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय दत्तला स्टेज ४ फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी तो अमेरिका किंवा सिंगापूरला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला युएसचा पाच वर्षांचा व्हिसा मिळाल आहे, अशी माहिती ‘मिड डे’ने दिली.

संजूबाबा लवकरच न्यूयॉर्कला रवाना होणार असून तेथील मेमोरिअल स्लोअन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत. याच ठिकाणी संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांच्यावर १९८० ते १९८१ दरम्यान कॅन्सरवर उपचार सुरू होते. वैद्यकीय बाबींच्या आधारवर व्हिसा मिळवण्यासाठी एका मित्राने संजूबाबाला मदत केल्याचं समजतंय. मान्यता आणि प्रिया यांच्यासोबत तो न्यूयॉर्कला जाणार असल्याचं कळतंय.

संजय दत्तची मुलगी त्रिशला न्यूयॉर्कमध्येच राहते. त्याच्या उपचारादरम्यान मान्यता आणि प्रियासुद्धा तिथेच राहणार आहेत. युएसचा व्हिसा मिळाला नसता तर संजय दत्तने सिंगापूरला जाण्याची तयारी केली असती. मात्र अमेरिकेचा व्हिसा मिळाल्याने आता तो लवकरच उपचारासाठी तेथे जाण्याची तयारी करणार आहे.

“संजू लढवय्या आहे. आम्ही सर्वजण या परिस्थितीवर मात करुन विजेते म्हणून बाहेर पडू” असा विश्वास मान्यताने व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *