महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। महाराष्ट्र सरकारनं राज्यात काही नव्या योजना राबवण्याचा सपाटा लावला असून, त्यामध्ये आता फडणवीस सरकारनं पर्यटनस्थळं आणि तीर्थक्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करत या ठिकाणांचा कायापालच करण्यासाठी आता राज्याची तिजोरी खुली केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये फडणवीस सरकारनं तब्बल 2954 कोटी रुपयांच्या योजनांना मंजूरी देत हा निधी राज्यातील मंदिरं आणि स्मारकांचं संरक्षण आणि त्यांच्या विकासासाठी खर्च केला जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
फडणवीस सरकारनं मंजुर केलेल्या या योजनांमध्ये सर्वात मोठी योजना 681.3 कोटी रुपयांची असून, त्याअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचं जतन आणि विकासाकामांसाठी खर्च केला जाणार आहे. तर, जोतिबा मंदिर विकासासाठी 259 कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
अष्टविनाय मंदिरांचाही विकास होणार…
संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या अष्टविनायक गणेश मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासाकामांसाठीसुद्धा मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, हा निधी 148 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे.
सदर निधीसंदर्भातील कोट्यवधींच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. ज्यानुसार पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8.21कोटी, थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिरासाठी 7.21कोटी, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7.84 कोटी, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12.14 कोटी, रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28.24 कोटी, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26.90 कोटी तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीसिद्धटेक
मंदिरासाठी 9.97 कोटी रुपयांचा निधी मान्य झाला आहे.
प्रशासकिय मान्यता मिळालेल्या या निधीमध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरासाठी 1,865 कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर मंदिरासाठी 275 कोटी रुपये, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी 1445 कोटी रुपये आणि माहुरगडासाठी 829 कोटी रुपयांचा निधीसही मान्यता मिळाली आहे.
राज्यात येत्या काही वर्षांत पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांचा विकास होणार
जवळपास 3000 कोटींच्या योजना आणि तरतुदी पाहता राज्यात येत्या काही वर्षांत पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांचा विकास होणार असल्याचीच बाब आता पुढं येत आहे. दरम्यान, अष्टविनायक मंदिर योजनेअंतर्गत 100 कोटींचा निधी थेट मंदिरांसाठी खर्च केला जाणार असून, 47.4 कोटी रुपये वीज आणि स्थापत्याशी संबंधित कामांसाठी खर्च केला जाणार आहे. यामध्ये मंदिर परिसरात विकासकामांसोबतच काही भाविकांना काही आवश्यक सुविधा पुरवण्यावरही भर दिला जाईल असं सांगण्यात आलं आहे. ज्यामुळं येत्या काही वर्षांमध्ये राज्यातील ही प्रमुख तीर्थक्षेत्र वेगळ्या रुपात भाविकांसाठी सज्ज असतील आणि त्यांचा कायापालट पाहणं सर्वांसाठीच एक परवणी असेल असं म्हणायला हरकत नाही.