महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। मागील काही दिवसांत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र गुरुवारपासून पावसाने उसंत घेतली आहे. दरम्यान मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस आणखी ओसरण्याचे संकेत देण्यात आले. पण आज ( 30) विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे. पुढील ४८ तासांमध्ये केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गोव्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबादपर्यंत सीमा कायम होती. गुरुवारी (ता. २९) विदर्भासह, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भागात, संपूर्ण पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्व भारतात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून, महाराष्ट्रातील पुढील प्रगतीसाठी वाट पहावी लागणार आहे.