शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा ; आता पहिलीपासून …….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जून ।। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या इयत्तेपासूनच याची सुरुवात करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी केली.

येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुसे यांनी पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात सुमारे अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाईल, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही भुसे यांनी जाहीर केले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वत:च्या शरिराची काळजी घेणे, व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय वादात अडकल्यामुळे मागे घेण्याची वेळ आली होती. आता सहा-सात वर्षांच्या चिमुकल्यांना सैनिकी शिस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यापूर्वी बालमानसशास्त्रज्ञ, संरक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जावी, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

आतापर्यंतचे वादग्रस्त निर्णय

●एकात्मिक पुस्तक योजनेचा निर्णय मागे

●‘एक राज्य एक गणवेश’ योजना गुंडाळली

●सीबीएसईप्रमाणे शाळांचे वेळापत्रक यंदा नाहीच

●अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा घोळ सुरू

●पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे

●संचमान्यतेचे निकष बदलल्याने अनेक शाळांना टाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *