महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जून ।। मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपासाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. वैष्णवीने पंख्याला साडीने गळफास घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी ही आत्महत्या की नियोजित हत्या, याबाबत संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबमध्ये पंखा आणि साडी पाठवण्यात येणार आहे. या तपासातून अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्य हादरून गेलं. ही घटना समोर आल्यानंतर महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी त्रास, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ या सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. राज्यात आज अनेक महिला या त्रासाला बळी पडत आहे. वैष्णवीला देखील सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. सासू, सासरे, दीर, नणंद आणि पती यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
.
याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींनी केला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास करण्यास सुरूवात केली. दरम्यान या तपासात बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या तपासातून समोर आल्या आहेत.
वैष्णवीचं ७१ किलो वजन होतं. त्यामुळे पंख्याला गुंडाळलेली साडी खरंच एवढं वजन पेलवू शकते का? या बाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे वैष्णवीची साडी आणि पंखा या दोन्ही गोष्टी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलं आहे. तसेच आोरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाईल देखील तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक पुरावे सापडण्याची शक्यता आहे.