महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जून ।। राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. राज्यातील काही जिल्हे तसेच घाटमाथ्यावर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.दरम्यान, मागील काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावली आहे. मान्सून सध्या मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानी फाटा, पुरी या भागांत थबकला आहे. 
मान्सून राज्याच्या काही भागांत दाखल झाल्यानंतर त्याची गती जोमाने सुरू झाली होती. मात्र, पोषक वातावरणाच्या अभावामुळे मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. दरम्यान, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाडा भागांत पुन्हा वादळी वारे (ताशी 30 ते 40 किलोमीटर वेग), मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरात राज्यात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली असून, त्याची स्थिती कायम आहे. याबरोबरच बांगला देशाच्या उत्तर भागातदेखील चक्रीय स्थिती कायम आहे. या स्थितीमुळे राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मात्र, त्याचा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. तेही दुपारनंतर पाऊस होईल. तर सकाळी ऊन पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
…असे आहेत ‘यलो अलर्ट’
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, पुणे, पुणे घाटमाथा, जळगाव, नाशिक, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम.