ट्रम्प पॅटर्न : १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जून ।। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विविध निर्णयांचा धडाका सुरुच आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही देशांची चिंता वाढवणारा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराण आणि अफगाणिस्तानसह १२ देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली. ट्रम्प यांनी बुधवारी ही घोषणा केली. यासह सात देशांमधील लोकांच्या प्रवेशावरही ट्रम्प यांनी कठोर प्रवास निर्बंध लादले आहेत. दहशतवादी आणि इतर धोक्यांपासून संरक्षणासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक असल्याचे म्हणत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात एका निर्णयावर स्वाक्षरी केली होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता या देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवास करता येणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातही अनेक देशांमधल्या लोकांवर प्रवास बंदी घातली होती. मात्र, नंतर ती उठवण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी बंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या सुरक्षेचा हवाला देत ट्रम्प यांनी सात देशांविरुद्धही कडक कारवाई केली आहे.

ट्रम्प यांनी अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांच्या नागरिकांच्या अमेरिका प्रवासावर बंदी घातली आहे. ट्रम्प यांनी या देशांव्यतिरिक्त, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात इतर देशांमधील लोकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी आणली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून प्रवास बंदी लागू होईल.

“मला अमेरिकेची आणि तिच्या लोकांच्या राष्ट्रीय सुरक्षेचे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी काम करावे लागेल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता, ज्यामध्ये राज्य आणि गृह सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालकांना अमेरिकेच्या सुरक्षेसंदर्भात एक अहवाल तयार करण्यास आणि विशिष्ट देशांमधून येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करतात का हे तपासून घेण्यास सांगितले होते. त्या अहवालानंतर, १२ देशांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे आणि ७ देशांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *