महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून बंद असलेला भिडे पूल आणखी दीड महिना बंदच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. महामेट्रोने मार्च महिन्यात या पुलाचं काम सुरू केलं होतं. सदाशिव पेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी भिडे पुलावर लोखंडी पादचारी पूल उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी मार्च पासून पूल बंद आहे. मात्र अद्याप पुलाचं काम पूर्ण झालं नाहीय. त्यामुळे आणखी दीड महिना हा पूल बंदच राहणार आहे.
पादचारी पुलाचं काम जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल आणि पूल ६ जून पासून खुला करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात अद्याप २० टक्केही काम पूर्ण झालं नाहीय. त्यामुळे महामेट्रोकडून हा पूल १५ ऑगस्टपर्यंत बंद ठेवावा अशी मागणी वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडे केली आहे.
भिडे पूल हा शहराच्या वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. पुणे शहराच्या पश्चिम उपनगरातील बहुतांश दुचाकी वाहतूक ही या नदीपात्रातील भिडे पुलावरून होते. शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येण्यासाठी दुचाकीस्वारांना हा सोयीचा मार्ग आहे. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ असते.
पावसाळ्यात केवळ मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास किंवा पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. पण महामेट्रोने पादचारी पुलाच्या कामासाठी हा पूल बंद ठेवला आहे. आता आणखी दीड महिन्याचा कालावधी या कामाला लागणार असल्याने या रस्त्यावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीय.