राज्यात मान्सूनला आता पुन्हा चालना मिळण्याची शक्यता ; हवामानतज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला, मात्र गेल्या आठवडाभरापासून काही भागाग पावसाने दडी मारली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 9 व 10 जूनला हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्गमध्ये 10 जून रोजी काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांतही पावसाची शक्यता असून नाशिक घाट परिसरात पावसाचा जोर जाणवू शकतो. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, धाराशिव या भागांत 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

पुणे व सातारा जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात सध्या पावसाची शक्यता कमी आहे, मात्र 9 ते 12 जूनदरम्यान नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे व उपनगरांमध्येही उकाडा वाढला असून, 12 जूननंतर पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना इशारा दिला आहे, विजांच्या गडगडाटात झाडाखाली थांबू नका, विजेच्या उपकरणांपासून दूर रहा, शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. राज्यात बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस सतर्कतेची गरज असून, नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

राज्यात कुठे, काय शक्यता ?
9 जूनला मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नंतर 10 ते 12 जूनदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल. 12 जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर 15 जूननंतर चांगल्या वाफशावर पेरणीचा निर्णय घ्यावा, असं हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं.

मान्सूनला आता पुन्हा चालना मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रात दमदार सुरुवातीनंतर थबकलेल्या मान्सूनला आता पुन्हा चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होऊन राज्यात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरात मान्सूनने मोठा ‘ब्रेक’ घेतल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 26 मे रोजी मुंबईत मान्सूनचा प्रवेश झाला आणि त्यानंतर तो गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झाला, मात्र त्याचवेळी पावसाने विश्रांती घेतली. यामुळे खान्देश, नाशिक आणि विदर्भातील उत्तर जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे राज्याच्या जवळपास अर्धा भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण नाही, त्यामुळे पुढील चार दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. मात्र 13 जूननंतर वातावरण मान्सूनसाठी अनुकूल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, यावर्षीचा मे महिना 124 वर्षांतील सर्वाधिक ओला महिना ठरला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मेमध्ये 126.7 मिमी पावसाची नोंद झाली, जी गेल्या शतकभरातील उच्चांकी नोंद आहे. हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे की, मृग नक्षत्राचा पाऊस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मान्सूनची वाटचालही गती घेईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *