महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – राज्यातील सर्व क व ड गटातील +(पुर्वाश्रमीचे तृतीय व चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांना आता दर दहा वर्षांनी वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार हा बदल करण्यात आला आहे. पुर्वी दर बारा वर्षांनी हा लाभ मिळत असे. यामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. दरम्यान, या नव्या नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ७७ पात्र ग्रामसेवकांना पहिल्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला आहे. यामुळे याआधी या सर्व ग्रामसेवकांना पुर्वीच्या तरतुदीनुसार १२ वर्षांनंतर देण्यात आलेला लाभ रद्द करण्यात आला आहे. यामुळे या सर्वांची दोन वर्षांचा फायदा झाला आहे.
याआधीच्या प्रचलित पद्धतीनुसार सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्षानंतर पहिला, २४ वर्षांनंतर दुसरा आणि ३६ वर्षांनंतर तिसरा लाभ दिला जात असे. नव्या पद्धतीनुसार अनुक्रमे १०, २० आणि ३० वर्षांनंतर असे वरिष्ठ वेतनश्रेणीचे तीन लाभ दिले जाणार आहेत.
राज्यातील क व ड गटातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी कमी असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सरसकट पदोन्नती मिळू शकत नाही. यावर उपाय म्हणून ही वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याची पद्धत १ आॅक्टोबर १९९४ पासून सुरू करण्यात आली आहे. १ जुलै २००१ पासून या योजनेला सेवांतर्गत आश्र्वासित प्रगती योजना असे नाव देण्यात आले आहे. पुढे १ आॅक्टोबर २००६ पासून ही योजना सुधारित करण्यात आली आहे. मात्र २ मार्च २०१९ पासून नवीन अनुक्रमे १०, २० आणि ३० वर्षाच्या तीन लाभांची ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यात वरिष्ठ वेतनश्रेणीची नवीन तीन लाभांची योजना गतवर्षीपासून सुरु झालेली आहे. यानुसार पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ७७ ग्रामसेवकांना पहिला लाभ देण्यात आला आहे. या सर्वांना आता ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी लागू झाली आहे.
– संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, पुणे.