महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आतापर्यंत तीनवेळा राज्य सेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 26) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले. मात्र, या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी संतापले असून त्यांनी ट्विटर वॉर सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोग सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे.
महत्वाचे ;
राज्य सेवा परीक्षेची शेवटची संधी असलेल्या परीक्षार्थींची संख्या लक्षणीय
मार्च 2020 मध्ये आयोगाने तयार केल्या आहेत परीक्षेच्या प्रश्नपत्रिका
संदर्भ बदलणार नाहीत, याची घेतली जातेय खबरदारी; उद्या (गुरुवारी) जाहीर होणार नवे वेळापत्रक
आतापर्यंत तीनवेळा पुढे ढकलल्या परीक्षा; पूर्व परीक्षा याच वर्षी घेण्याचे आयोगाचे नियोजन
परीक्षा पुढे ढकलल्याने बहुतांश विद्यार्थी संतापले; काहींना मिळाला दिलासा
पुढील वर्षीपासून परीक्षार्थींना ऍपच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड, शंका निरसन, कॉल सेंटर होणार उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवेची पूर्व परीक्षा घेण्यासाठी मार्च 2020 मध्ये उत्तरपत्रिका तयार केल्या आहेत. मात्र, परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने त्यातील काही प्रश्नांचे संदर्भ बदलतील, असा पेच आयोगासमोर निर्माण झाला आहे. तर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुधारीत वेळापत्रक तत्काळ जाहीर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, काहींना वाटू लागले आहे की यंदा परीक्षाच होणार नाहीत, काहींना वय संपुष्टात येण्याची चिंता लागली आहे. परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय अंगलट येऊ नये म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने सावध पवित्रा घेतल्याचीही चर्चा आहे. आता आयोगाने सुधारीत वेळापत्रक तयार करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तत्पूर्वी, आयोगाने परीक्षा केंद्रांचा आढावा घेऊन त्याठिकाणी सॅनिटायझिंगसह अन्य कामांसाठी निवीदाही काढली आहे. परीक्षा सर्व नियमांचे काटेकोर पालन करुनच होतील, असेही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
जिल्हा केंद्र निवडीचा आज निर्णय
स्टूडंस राईट्स असोसिएशनने राज्य सेवा पूर्व परीक्षेचे परीक्षा केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी निवडण्याची संधी मिळावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार असून यावेळी अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.