ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार ; ‘आषाढी’साठी विशेष बसेस : प्रताप सरनाईक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जून ।। आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रवासातदेखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ५००० विशेष बसेस सोडल्या होत्या. याद्वारे यात्राकाळामध्ये सुमारे २१ लाख, भाविक-प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती. यंदा यात्रा काळामध्ये विनातिकीट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे.

वाहतुकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत.

येथून सुटणार एसटी बस
चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
भीमा यात्रा बसस्थानक देगाव : छत्रपती संभाजीनगर , नागपूर व अमरावती प्रदेश.
विठ्ठल कारखाना : नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर.
पांडुरंग बसस्थानक : सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *