महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जून ।। संतश्रेष्ठ जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या 340 व्या पालखी सोहळ्याचे यंदा 18 जून रोजी देहूतून प्रस्थान होणार आहे. वारीच्या या पावन यात्रेतील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी भाग म्हणजे पालखी ओढणारी बैलजोडी… यंदा हा मान लाभला आहे, सीमाभागातील पवित्र तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील खोत कुटुंबाच्या बैलजोडीला. या बैलजोडीचे पूजन संस्थानने आप्पाचीवाडीतच करून त्यानंतर त्या बैलजोडीला विधिवत देहूकडे रवाना करण्यात आले.
यावर्षीपासून देहू संस्थानने पालखी ओढण्यासाठी बाहेरून निवड करण्याऐवजी आपल्याच वतीने निवडलेली बैलजोडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत संस्थानने विविध भागांतील शोध घेतला आणि अखेर ते आले – संत हालसिद्धनाथांच्या पावन भूमीवर – आप्पाचीवाडीत. याच पवित्र भूमीत बाबुराव अर्जुन खोत यांच्या गोठ्यात ‘माणिक-राजा’ ही देखणी, तेजस्वी खिलार बैलजोडी लाभली. आप्पाचीवाडी ही हालसिद्धनाथांची भूमी व येथील भाकणूक प्रसिद्ध आहे. याच नाथांचे खोत हे मानकरी आहेत.
बैलजोडीच्या पूजनासाठी आप्पाचीवाडीत लेझीम, भजनी मंडळांसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालं. या घटनेने केवळ खोत कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण सीमाभागाला अभिमानाचा क्षण दिला. खोत कुटुंबाने यापूर्वीही 2021 मध्ये संत निवृत्तीनाथ आणि 2023 मध्ये तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आपली बैलजोडी दिली होती.‘माणिक-राजा’ ही जोडी केवळ बैलजोडी नाही, तर ती भक्ती आणि सेवेचे प्रतीक आहे. ज्या तळमळीने आणि श्रध्देने खोत कुटुंब आपल्या गोठ्यात बैल संगोपन करते, तीच भावना त्यांच्या सेवेच्या वृत्तीतही दिसते. गेल्या सात दशकांपासून हे कुटुंब एकत्र राहते. पालखी प्रस्थानासाठी देहू येथे झालेल्या सोहळ्यात संस्थानचे ट्रस्टी विश्वजित मोरे, तात्या मोरे, संतोष मोरे, विक्रमसिंह मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
पांडुरंगाच्या व हालसिद्धनाथांच्या कृपेने आमच्या गोठ्यातील बैलजोडी पालखी सेवेसाठी निवडण्यात आली. संस्थानने ही जोडी खरेदी केली असली, तरी ही सेवा हे आमचं भाग्य आणि आत्मिक समाधान आहे.
– बाबुराव खोत, आप्पाचीवाडी