महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जून ।। पुण्याला शुक्रवारी (दि. 13) संध्याकाळी वादळी वार्यासह मुसळधार पावसाने झोडपले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची त्रेधा उडाली. वाहनांत पाणी गेल्याने मध्येच वाहने बंद पडण्यासह अनेक भागांत वाहतूककोंडी झाली होती.
पुण्यातील खड्डेमुक्त अशी ओळख असलेल्या जंगली महाराज रस्त्यावरही पाणी साचले होते. मध्यवस्तीत काही ठिकाणी फुटपाथ देखील पाण्याखाली गेले होते. काही तासच झालेल्या पावसामुळे महानगरपालिकेच्या ड्रेनेज व नालेसफाईची पुन्हा पोलखोल झाली आहे. काही तास झालेल्या पावसामुळे पुणे पुन्हा तुंबल्याचे चित्र दिसून आले. (Latest Pune News)
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होते. तसेच, सकाळपासून उकाडा देखील जाणवत होता. दरम्यान, सायंकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली. या पावसासह वादळी वारा व विजांचा कडकडाट देखील होता. पावसाचा जोर एवढा होता की समोरून येणारी वाहने दिसत नव्हती. जंगली महाराज रस्ता, पौड रस्ता, कोथरूड सिटी प्राइड, अलंकार पोलिस चौकी परिसर, नरपतगिरी चौक, रास्ता पेठ, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, बिबवेवाडी, स्वारगेट, भंडारकर रस्ता, प्रभात रस्त्यासह मध्यवर्ती पेठांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते.
शहरात 34 ठिकाणी झाडपडी
शहर व परिसरात गुरुवारी (दि. 12) रात्री नऊ वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत पावसामुळे 34 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद अग्निशमन दलाकडे करण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली.
गुरुवारी रात्री नऊनंतर जोरदार पाऊस सुरू झाला. त्यानंतर सलग दोन तास पाऊस सुरू होता. मध्यरात्रीपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांत 34 ठिकाणी झाडे पडली. पाषाण रस्त्यावरील पंचवटी परिसरात एक मोठे झाड मोटारीवर कोसळले.
जवानांनी फांद्या कापून खाली अडकलेली मोटार बाहेर काढली. या भागातील रस्ता झाड पडल्यानंतर बंद झाला होता. जवानांनी फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
शहरात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पुण्यात संध्याकाळी आलेल्या पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाण्यामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जात असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. एकीकडे पाणी आणि दुसरीकडे वाहतूक कोंडी या दुहेरी मार्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते.
रस्त्यांना ओढ्यांचे रूप
पुण्यात शुक्रवारी पाऊस झाल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची त्रेधा उडाली होती. अनेक वाहने या पाण्यात अडकून पडली होती. परिणामी, काही नागरिक वाहने ढकलत पुढे जात होते.
कर्मचारी ‘ऑन फिल्ड’
शहराच्या विविध भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी आल्यावर पालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने याची दखल घेत ड्रेनेजची झाकणे काढून पाण्याला वाट मोकळी करून दिली. स्वारगेट चौक, पौड रस्ता, कोथरूड परिसर, डेक्कन आदी ठिकाणी पालिकेचे कर्मचारी तैनात होते. त्यांनी केलेल्या कामामुळे हळूहळू काही ठिकाणी तुंबलेले पाणी ओसरले.
जंगली महाराज रस्ता बुडाला पाण्यात
पुण्यातील आदर्श व खड्डेमुक्त रस्ता अशी ओळख असलेल्या जंगली महाराज मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. या मार्गावर पदपथ सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले. यासाठी तब्बल 17 कोटी खर्च करण्यात आले. मात्र, असे असताना देखील रस्त्यावरच साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे या कामांच्या दर्जावर आता प्रश्न उपस्थित केलाजात आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष नावालाच…
पुण्यातील अनेक भागांत पाणी साचल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी काही नागरिकांनी पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला फोन केले. काही नागरिकांनी कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाला फोन करूनही नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली.
मध्यवस्तीतील रस्त्यावरील फुटपाथ गेले पाण्याखाली
पुण्यात शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवर पाणी साठले होते. काही ठिकाणी तर फुटपथही पाण्याखाली गेले होते. या पाण्यात नागरिक उभे होते, तर काही ठिकाणी या पाण्यातून पाय तुडवत पुढे जात असल्याचे चित्र होते. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रास्ता पेठे येथे काही भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते.
नाले आणि ड्रेनेजसफाईचा पालिकेचा कोट्यवधींचा खर्च पाण्यात
पावसाळ्यात पुणे तुंबू नये, यासाठी महापालिकेने पाणी साठणार्या तब्बल 201 ठिकाणांची यादी करून त्या ठिकाणी पुन्हा पाणी साठणार नाही, यासाठी कामे केली. मात्र, या कामांची पोलखोल शुक्रवारी झालेल्या पावसात पुन्हा झाली आहे. शहरात गेल्या एप्रिल महिन्यापासून ही कामे सुरू आहेत. मात्र, असे असताना देखील पाण्याचा निचरा न झाल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते.