मार्करम – बवुमा यांच्या झुंजार खेळीमुळे दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर : ऑस्ट्रेलिया आज ताकद लावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जून ।। ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांत संपुष्टात आणल्यानंतर २८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ५६ षटकांत २ बाद २१३ धावा अशी भक्कम मजल मारली. एडेन मार्करमने शानदार नाबाद शतक, तर कर्णधार तेम्बा बवूमाने नाबाद अर्धशतक झळकावत दक्षिण आफ्रिकेला भक्कम स्थितीत आणले. दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून अद्याप केवळ ६९ धावांनी दूर आहे.

ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला रायन रिकेल्टनच्या (६) रूपाने झटपट धक्का बसला. परंतु, मार्करमने विआन मुल्डरसह दुसऱ्या गड्यासाठी ९३ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. स्टार्कनेच ही जोडी फोडताना मुल्डरला (२७) बाद केले. यानंतर बवुमाने मार्करमला चांगली साथ दिली. मात्र, पायाचे स्नायू ताणल्याने त्याला धावताना संघर्ष करावा लागला. शिवाय तो २ धावांवर खेळत असताना स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेलही सोडला. यावेळी, चेंडूचा अंदाज घेण्यात चुकल्याने स्मिथ दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. ही चूक ऑस्ट्रेलियाला अत्यंत महागात पडली.

मार्करम – बवुमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी २३२ चेंडूंत नाबाद १४३ धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, बवुमा १२१ चेंडूंत ५ चौकारांसह ६५ धावांवर, तर मार्करम १५९ चेंडूंत ११ चौकारांसह १०२ धावांवर खेळत होता.

त्याआधी, ८ बाद १४४ धावांवरून सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने फलंदाजीत छाप पाडली. त्याने शानदार अर्धशतक झळकावत दक्षिण आफ्रिकेला झुंजवले. दिवसातील तिसऱ्याच षटकात कॅगिसो रबाडाने नॅथन लायनला (२) पायचीत पकडले. मात्र, यानंतर स्टार्कने १३६ चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ५८ धावा काढत ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत आणले. जोश हेझलवूडने ५३ चेंडूंत २ चौकारांसह १७ धावा केल्या. दोघांनी दहाव्या गड्यासाठी १३५ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी करून द. आफ्रिकेला सहजासहजी वर्चस्व मिळवू दिले नाही. अखेर मार्करमने हेझलवूडला बाद करून ही जोडी फोडली आणि ऑस्ट्रेलियाचा डावही संपुष्टात आणला. कॅगिसो रबाडाने ५९ धावांत ४ बळी घेतले. लुंगी एनगिडीने ३८ धावांत ३ बळी घेतले.

तो झेल सुटला आणि…
स्टार्क १२ धावांवर खेळत असताना कॅगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक काइल वेरेयनी याने झेल सोडला. या जीवदानाचा फायदा घेत स्टार्कने नंतर महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली.

विमान अपघातग्रस्तांना श्रद्धांजली
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी दक्षिण आफ्रिका – ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंसह सामनाधिकारी, पंच आणि स्टेडियममधील उपस्थित सर्वांनी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, सर्व खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून खेळले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५६.४ षटकांत सर्वबाद २१२ धावा.
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ५७.१ षटकांत सर्वबाद १३८ धावा.

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : मार्नस लाबुशेन झे. वेरेयने गो. यान्सेन २२, उस्मान ख्वाजा झे. वेरेयने गो. रबाडा ६, कॅमरून ग्रीन झे. मुल्डर गो. रबाडा ०, स्टीव्ह स्मिथ पायचीत गो. एनगिडी १३, ट्रॅविस हेड त्रि. गो. मुल्डर ९, ब्यू वेबस्टर पायचीत गो. एनगिडी ९, ॲलेक्स कॅरी पायचीत गो. रबाडा ४३, पॅट कमिन्स त्रि. गो. एनगिडी ६, मिचेल स्टार्क नाबाद ५८, नॅथन लायन पायचीत गो. रबाडा २, जोश हेझलवूड झे. महाराज गो. मार्करम १७. अवांतर – २२. एकूण : ६५ षटकांत सर्वबाद २०७ धावा. बाद क्रम : १-२८, २-२८, ३-४४, ४-४८, ५-६४, ६-६६, ७-७३, ८-१३४, ९-१४८, १०-२०७.
गोलंदाजी : कॅगिसो रबाडा १८-१-५९-४; मार्को यान्सेन १८-३-५८-१; विआन मुल्डर ८-१-१८-१; लुंगी एनगिडी १३-१-३८-३; केशव महाराज ६-१-१७-०; एडेन मार्करम २-१-५-१.

दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : एडेन मार्करम खेळत आहे १०२, रायन रिकेल्टन झे. कॅरी गो. स्टार्क ६, विआन मुल्डर झे. लाबुशेन गो. स्टार्क २७, तेम्बा बवुमा खेळत आहे ६५. अवांतर : १३. एकूण : ५६ षटकांत २ बाद २१३ धावा. बाद क्रम : १-९, २-७०. गोलंदाजी : मिचेल स्टार्क : ९-०-५३-२; जोश हेझलवूड १३-०-४३-०; पॅट कमिन्स १०-०-३६-०; नॅथन लायन १८-३-५१-०; ब्यू वेबस्टर ४-०-११-०; ट्रॅविस हेड २-०-८-०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *