जबरदस्त … ३०० जॅक लावून वाढवली घराची उंची

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – आपली चारचाकी गाडी पंक्चर झाल्यावर जॅक लावून दुरुस्ती आपण करतो. मात्र अकोल्यातील ययाती तायडे यांनी आपल्या घराची उंची वाढविण्यासाठी जॅकचा वापर केला आहे. त्यांचे जवळपास १२०० स्क्वेअर फुटांचे हे घर तब्बल ३०० जॅक लावून उचलण्यात आले आहे. यासाठी पाया आणि भिंत कापून शेकडो जॅकच्या मदतीने घराला उचलण्यात आले, त्यानंतर या गॅपमध्ये विटा रचून बंगल्याची उंची सुमारे ४ फूट वाढवली जाणार आहे. अशाप्रकारे बंगल्याची उंची वाढवण्याचा हा विदर्भातील हा पहिलाच प्रकार आहे.

हे घर उंच उचलण्यामागचं कारण म्हणजे ययाती तायडे यांच्या घरासमोर वर्षानुवर्ष रस्त्याची दुरुस्ती होत राहिली, त्यामुळे रस्त्याची उंची वाढत गेली. पण घर जुने असल्याने घराची उंची रस्त्याच्या तुलनेत कमी झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी घरात शिरायचे. त्याचप्रमाणे सर्विस लाईनचे सांडपाणीही त्यांच्या घरात शिरायचे. त्यामुळे तायडे कुटुंबीय प्रचंड वैतागले होते. या सगळ्यामुळे ते नवीन घर बांधण्याचा विचार करत होते.

मात्र, जुन्या घराशी असलेली आपुलकी त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे तायडे कुटुंबीयांनी घर पाडण्याऐवजी ‘हाऊस लिफ्टिंग’चा अवलंब करायचा ठरवला.त्यांनी हरियाणाच्या एका ठेकेदाराला हे काम दिले. या कामासाठी पैसे आकारले जातात ते म्हणजे फक्त २०० रुपये प्रति स्केवर फिट. हाऊस लिफ्टिंगची पद्धत फार ओळखीची नसल्याने नागरिकांनाही याबाबत कुतूहल वाटत आहे आणि तायडे यांचे घर सध्या अकोलेकरांसाठी पर्यटन स्थळ झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *