![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जून ।। पुण्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दौंडमधून दररोज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन सुटते. नेहमीप्रमाणे ही ट्रेन आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली पण अचानक ट्रेनच्या एका डब्यात आग लागली आणि गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड-पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये अचानक आग लागली. दौंडवरून दररोज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन सुटते. या ट्रेनला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले. किंकाळ्या, आरडाओरडा अन् सर्वांची पळापळ झाली. इंजिनपासून तिसऱ्या बोगीत आग लागली. आग लागल्याचे कळताच ट्रेन थांबवण्यात आली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.
दौंड – पुणे डेमू ट्रेन दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली. त्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता. दरवाजा लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता. या व्यक्तीने आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले. या डब्यामध्ये धूर देखील पसरला होता त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
