संधीसाधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही ; शरद पवारांनी युतीची शक्यता फेटाळून लावली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून ।। राज्यात मागील दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली असताना शरद पवारांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांसोहतच्या युतीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसंच भाजपाशी काही संबंध ठेवू नका असं म्हटलं आहे. यावर अजित पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“सगळ्यांना बरोबर घ्यायचं असा सूर आहे. त्यात काही गैर नाही. पण कोणाला बरोबर घ्यायचे हा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महात्मा गांधी, नेहरु, चव्हाण, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आहेत. सत्तेसाठी भाजपासोबत गेले ही भूमिका कोणी मांडत असेल तर ती मान्य नाही. कोणाशीही संबंध ठेवा, पण भाजपाशी संबंध हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही. त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची आहेत,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

“अनेक प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससारखे संघटन हवं आहे. त्यासाठी महापालिका निवडणूकीत नवीन नेतृत्व तयार करायचे आहे. आपल्याला विकास करायचा आहे. त्यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचं आहे. जे सोडून गेले त्यांची चिंता करू नका. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

“1978 मध्ये मला अनेक आमदार सोडून गेले. मी चिंता केली नाही. पुन्हा मी पक्ष उभा केला. कोणी सोडून गेले याची चिंता करू नका. जनता सुज्ञ आहेत. लोकशाही त्यांच्या मुळे जिवंत आहे”, असं शरद पवारांनी सांगितलं.

“पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा. निवडणुकीची काळजी करू नका, सगळ्या जागा लढवू. आपल्या सोबत जो कोणी येत असेल त्याचं स्वागत आहे. जास्तीत जास्त नवीन नेतृत्वाला संधी देऊ. महिलांसह तरुणांना संधी दिली जाईल. ज्यांनी शहराच्या वाटण्या केल्या, राजकारणात नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांना दूर करू,” असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया
“तुम्हाला आठवत असेल मी जे बोललो होतो. पवार साहेब विचारधारेचे पक्के आहेत. शाहू, फुले, आंबेडकर या विचारांवर त्यांची श्रद्धा आहे. पवारसाहेब त्यांच्यासोबत जाणार नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *