महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून ।। हरिद्वार येथून केदारनाथला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असतानाही दोन रुग्णवाहिका त्या मार्गाने जात होत्या. रुग्णवाहिका असल्याने वाहतूक कोंडीतून त्यांची लवकर सुटकाही होत होती. पण जेव्हा पोलिसांनी रुग्णवाहिका रोखली तेव्हा आतमधील दृश्य पाहून चक्रावले. कारण आतमध्ये रुग्ण नाही तर चक्क भक्तांची गर्दी भरलेली होती. या सर्वांनी केदारनाथ धामला लवकरात लवकर पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा आधार घेतला होता. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांनी इमर्जन्सी मार्गाने प्रवास केला. पण पोलिसांनी अडवल्याने त्यांचा सगळा प्लान फसला. सोनप्रयाग पोलिसांनी दोन्ही रुग्णवाहिका जप्त केल्या असून, दोन्ही चालकांनां दंडही ठोठावला आहे.
14 जूनला काही भक्तांनी हरिद्वार येथून उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी दोन रुग्णवाहिका बूक केल्या आणि त्यांना टॅक्सीत रुपांतरित केलं. यामागील हेतू एकच होता तो म्हणजे, वाहतूक कोंडी टाळावी आणि मंदिरात लवकर पोहोचावं हाच होता.
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात असल्याने, पोलीस रोखणार नाही असा भक्तांना विश्वास होता. ते सर्वजण रुग्णवाहिकेत बसले आणि सायरन सुरु करत प्रवास सुरु केला.
एकामागोमाग एक त्यांनी सर्व चेक पोस्ट सुरक्षितपणे ओलांडले. मात्र अखेर सोनप्रयाग पोलिसांना संशय आला आणि त्यांनी रुग्णवाहिका अडवली. गौरीकुंड ते केदारनाथ या मार्गावर जेव्हा एखादा भाविक आजारी पडतो किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा सर्व चेकपोस्टना सतर्क केले जाते. तथापि, सोनप्रयाग पोलिसांना दोन्ही रुग्णवाहिकांबद्दल कोणतीही माहिती नव्हती. जेव्हा त्यांना सायरन वाजवत वेगाने दोन वाहनं येताना दिसली तेव्हा त्यांना थांबवण्यात आलं.
त्यांनी रुग्णवाहिका उघडून पाहिलं असता आतमघ्ये चक्क भक्त बसले होते. हे सर्व एसी रुग्णवाहिकेतून प्रवास करत होते. एक रुग्णवाहिका राजस्थानची होती जिचा क्रमांक RJ14 PF 2013 होता, तर दुसरी हरिद्वारची होती जिचा क्रमांक UK08 PA 1684 होता. मोटार वाहन कायद्यांतर्गत दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली आणि चालकांना दंड ठोठावण्यात आला.
सहसा हरिद्वार ते ऋषिकेश, व्यासी, देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, तिलवाडा, ऑगस्टमुनी, गुप्तकाशी फाटा यासारख्या ठिकाणी कडक पोलिस तपासणी केली जाते, परंतु, कदाचित आणीबाणीच्या परिस्थितीमुळे, या ठिकाणांच्या पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवली नाहीत. केदारनाथचे दरवाजे 2 मे रोजी उघडले गेले आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या समारोप समारंभापर्यंत खुले राहणार आहेत.