Maharashtra Rainfall: राज्यात पुढील २४ तास धो-धो ! पुणे, नाशिकला रेड अलर्ट, : अतिवृष्टीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जून ।। राज्यभरात पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. राज्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून, आजही पावसाने उसंत घेतली नसल्याचं चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई शहरात सर्वाधिक १४२,६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :-

ठाणे ९०.३

रायगड १३४.१

रत्नागिरी ६०.९

सिंधुदुर्ग ९.४

पालघर १२०.९

नाशिक ४०.३

धुळे २५.५

नंदुरबार ३३.४

जळगाव ४.७

अहिल्यानगर ८.७

पुणे २९.३

सोलापूर ०.३

सातारा १७.७

सांगली ५.९

कोल्हापूर १२.१

छत्रपती संभाजीनगर ४.५

जालना २.१

बीड ०.२

धाराशिव ०.२

नांदेड ०.६

परभणी ०.५

हिंगोली ०.८

बुलढाणा ३.१

अकोला ८.६

वाशिम १.७

अमरावती ५.९

यवतमाळ १.२

वर्धा ३.२

नागपूर ०.७

भंडारा ०.३

चंद्रपूर ४.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई उपनगरात झाड पडून एक व्यक्ती जखमी, तर सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक पाळणा तुटून एकाचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे ता. संगमेश्वर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

सागरी किनारपट्टींवर उच्च लाटांचा इशारा
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागात ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. हा इशारा १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते १९ जून २०२५ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत लागू असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *