महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जून ।। करदात्यांशी संबंधित आता 1 जुलैपासून एक नवीन नियम लागू होणार आहे. आता पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल. कर प्रणाली अधिक मजबूत करण्यास आणि फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून या नवीन नियमानुसार, तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकणार नाही.
त्यामुळे, ज्यांच्याकडे अद्याप आधार कार्ड नाही, त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बनवावे. या पावलामुळे करचोरी रोखली जाईल आणि करदात्यांची ओळख अधिक अचूक होईल, असं सरकारचे म्हणणे आहे. म्हणून जर तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर आधी तुमचे आधार कार्ड बनवून घ्या.
पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य
सध्याच्या नियमानुसार, पॅन क्रमांकासाठी अर्ज करताना अर्जदाराला त्याचे नाव आणि जन्मदिनांकाचा पुरावा जोडून किंवा पर्यायी ओळख कागदपत्रे जोडून अर्ज करता येत होता. मात्र, एक जुलैपासून तसे करता येणार नाही. डिजिटलायझेशनची प्रक्रिया सध्या सुरू असल्यामुळे पॅनसाठी ‘आधार’वर आधारित पडताळणी प्रणाली राबवण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.
एकाच व्यक्तीकडे अनेक पॅनकार्डे असण्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर पॅन आणि ‘आधार’ एकमेकांशी संलग्न करणे अनिवार्य झाले. त्याचप्रमाणे जीएसटी नोंदणी करताना अनेक पॅन क्रमांकांच्या मदतीने नोंदणी करून जीएसटी चुकवण्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. म
प्राप्तिकर विभाग ‘पॅन २.०’ ही मोहीम राबवण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहिमेअंतर्गत पॅनकार्ड धारकांना पॅनकार्डे डिजिटल स्वरूपात दिली जाणार आहेत. ‘टॅन’ कार्डांचेही डिजिटायझेशन होणार आहे. यामुळे करदात्यांना चांगली सेवा दिली जाईल, असा प्राप्तिकर विभागाचा दावा आहे. सध्या ज्यांच्याकडे पॅनकार्ड आहेत, ते तीच कार्ड वापरू शकतील. नवी मोहीम राबवली जाणार असली, तरी जुनी कार्ड वैध राहणार आहेत.