महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जून ।। जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांमधील २०० वारकऱ्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी उपचार केले. शहर हद्दीतील पालखीमार्गावर ३८ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर डायल १०८ कडून गेल्या दोन दिवसांत ३६९ रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा तसेच वैद्यकीय उपचार दिले. एकंदरीत वारीच्या काळात आतापर्यंत ५७० वारकऱ्यांना वैद्यकीय उपचार दिले आहेत. मुक्काम स्थळांवरही (भवानी पेठ व नाना पेठ) २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहे. महिला व बालके यांच्यासाठी हिरकणी कक्ष, फिजिओथेरपी सेवा व तज्ज्ञांकडून सेवा देण्यात येत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संत ज्ञानेश्वर पालखी मार्गासाठी २२ आणि संत तुकारामांच्या पालखी मार्गासाठी १६ वैद्यकीय पथकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय पुणे मनपाचे २२ दवाखाने २४ तास सेवेत राहणार असून, वारकऱ्यांना मोफत प्राथमिक उपचार मिळणार आहेत.
महापालिकेमार्फत २२ फिरती वैद्यकीय पथके आहेत. तसेच ‘१०८’च्या २० रुग्णवाहिका सज्ज आहेत. तर पुण्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील १० टक्के तर महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात १० आयसीयूच्या खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. त्याचबरोबर आरोग्यविषयक माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्यात आपत्कालीन क्रमांक व कृती आराखडा दिला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, डॉ. सूर्यकांत देवकर यांनी महापालिका येथे रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकांचा आढावा घेतला.
डायल १०८ रुग्णवाहिकांकडूनही सेवा
शहर व जिल्ह्यात ‘डायल १०८’च्या १०० रुग्णवाहिकांकडून वारी मार्गावर आतापर्यंत ३६९ रुग्णांना उपचार दिले. यापैकी ३१४ वारकऱ्यांना रुग्णवाहिकांमधून जागेवर उपचार दिले, तर ५५ रुग्णांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात उपचार दिले असल्याची माहिती डायल १०८ चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे यांनी दिली.