महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जून ।। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आणि लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्याने संपूर्ण शहर हरिनामाच्या गजराने भारावून गेले. सकाळपासूनच विविध भागांतून टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचे पथक शहरातील रस्त्यांवर दाखल होत होते. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख रस्ते सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. पालखीच्या आगमनाने पुण्यात एक उत्सवमय वातावरण निर्माण झाले असून, विविध सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
पालखी मार्गावरील प्रमुख रस्ते काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, अप्पा बळवंत चौक, आणि टिळक चौक मार्ग या भागांतील वाहतूक थांबवण्यात आली होती. महापालिकेच्या समन्वयाने वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवक रस्त्यांवर नियंत्रण ठेवताना दिसत होते, ज्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. तसेच, पादचाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अनेक वारकऱ्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
बाजारपेठा गजबजल्या
पालख्यांच्या आगमनासोबतच पुण्यातील बाजारपेठांमध्येही मोठी उलाढाल सुरू झाली आहे. वारकरी येथे आपल्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक पुस्तके, माळा, टाळ-मृदंग आणि अन्य पूजेच्या साहित्यापासून ते तंबू, ताडपत्री, कपडे, छत्र्या, प्लॅस्टिक कागद आणि दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंची खरेदी करत आहेत. शहरातील तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ आणि अप्पा बळवंत चौक या भागांत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.
बाजारपेठा गजबजल्या
पालख्यांच्या आगमनासोबतच पुण्यातील बाजारपेठांमध्येही मोठी उलाढाल सुरू झाली आहे. वारकरी येथे आपल्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक पुस्तके, माळा, टाळ-मृदंग आणि अन्य पूजेच्या साहित्यापासून ते तंबू, ताडपत्री, कपडे, छत्र्या, प्लॅस्टिक कागद आणि दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंची खरेदी करत आहेत. शहरातील तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ आणि अप्पा बळवंत चौक या भागांत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.
विविध संस्थांकडून सेवा
श्रीमंत पेशवेकालीन मंदिरातर्फे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ‘चांगदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज भेट’ पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने पालखी सोहळ्याला एक वेगळी सांस्कृतिक छटा दिली.
निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आणि ‘माउलींची पदसेवा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे, ज्यामुळे हजारो वारकऱ्यांना आरोग्यसेवा मिळते.
बुधवार पेठ येथे पुणे महापालिका आणि जॉन पॉल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगाविषयी जनजागृती आणि आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २० वर्षांपासून ही महत्त्वपूर्ण सेवा दिली जात आहे.
सामाजिक आणि आध्यात्मिक सेवांचा संगम
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात जिथे एकीकडे भक्तीचा पूर आला आहे, तिथेच दुसरीकडे आरोग्य, स्वच्छता आणि समाजसुधारणेचे उपक्रमदेखील वारकऱ्यांच्या सेवेत रुजले आहेत. वारकरी आपल्या पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, त्यांच्या पाठीशी शेकडो हात मदतीसाठी तयार आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांतर्फे पाणी, चहा, नाश्ता, खाऊची पाकिटे, लाडू, फराळ आणि छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे, तसेच थकलेल्या वारकऱ्यांसाठी मालिश सेवा, सलून सेवा, बॅग आणि चप्पल शिवणे अशा विविध प्रकारच्या सेवाही दिल्या जात आहेत.
अतिक्रमण हटले, वाट मोकळी झाली
पुणे महापालिकेने पालखीमार्गावरील अतिक्रमण काढल्यामुळे वारकऱ्यांना मोकळेपणाने चालता येत आहे. रस्त्यांवर विश्रांतीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून दिली गेली आहे. पालखीमार्ग स्वच्छ आणि अडथळामुक्त राहावा यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही सक्रिय योगदान देत आहेत.