‘राजकारणात प्रवेश करण्यास आवडेल का?’, ‘सौरव गांगुली स्पष्टच बोलला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जून ।। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) राजकारणात येण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे, परंतु भारतीय संघाचं प्रशिक्षकपद भूषविण्यास विरोध नसल्याचंही म्हटलं आहे. सौरव गांगुली जुलै महिन्यात 53 वर्षांचा होणार आहे. गांगुली 2018-19 ते 2022-24 दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाचा टीम डायरेक्टर होता. “मी कधीच याबद्दल विचार केला नव्हता, कारण मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये होतो,” असं गांगुलीने पीटीआयला दिलेल्या फ्री-व्हीलिंग पॉडकास्ट मुलाखतीत भारतीय संघाचं प्रशिक्षक व्हायला आवडेल का? असं विचारलं असता सांगितलं. “मी 2013 मध्ये स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं थांबवलं. नंतर बोर्ड (बीसीसीआय) अध्यक्ष झालो,” असं गांगुली म्हणाला. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं मोठं काम केलं. भारताचीय संघाचा प्रशिक्षक बनून अधिक योगदान देऊ शकला असता का? असं विचारलं असता तो म्हणाला “आम्ही भविष्यात काय आहे ते पाहू. मी फक्त 50 वर्षांचा आहे. काय होतं ते पाहू. माझी त्यासाठी तयारी आहे. ते कुठे जाते ते पाहू”.

सौरव गांगुलीने यावेळी आपण राजकारणात प्रवेश कऱणार नसल्याचंही स्पष्ट केलं. तुला 2026 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करण्यास आवडेल का? असं विचारण्यात आलं असता गांगुलीने हसत उत्तर दिलं की, “मला त्यात काही रस नाही”. तुला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तर? असं विचारलं असता त्याने पुन्हा एकदा मला रस नाही हेच उत्तर दिलं.

गांगुलीने यादरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीर याचंही कौतुक केले. या वर्षाच्या सुरुवातीला दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर त्याने आपली गती वाढवली आहे असं वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

“गौतम चांगलं काम करत आहे. त्याने सुरुवात थोडी संथ गतीने केली, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करला, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याने सुधारणा केली. ही मालिका (इंग्लंडविरुद्ध) मोठी असणार आहे,” असं गांगुलीने सांगितलं. गांगुलीने यादरम्यान गंभीरचं खेळाप्रती असणारं प्रेम आणि स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं.

“मी त्याला या भूमिकेत फार जवळून पाहिलेले नाही, परंतु मला माहित आहे की तो खूप उत्साही आहे. मी त्याच्या रणनीती जवळून पाहिल्या नाहीत कारण मी त्याच्यासोबत प्रशिक्षक म्हणून काम केलेले नाही,” असं गांगुली म्हणाला.

“तो फार स्पष्टवक्ता आहे. तो गोष्टी स्पष्टपणे पाहतो. तो त्याला संघस खेळाडू, लोक आणि इतर गोष्टींबद्दल काय वाटतं त्याबद्दल स्पष्ट असतो. तुम्ही बाहेरुनच सांगू शकता की, तो पारदर्शी व्यक्ती आहे. तुम्ही जे पाहता तेच तुम्ही मिळवता,” असं सांगत सौरव गांगुलीने त्या दिवसांची आठवण सांगितली जेव्हा गौतम गंभीर वरिष्ठ खेळाडूंचा फार आदर करत असे.

“मी त्याच्यासोबत खेळलो आहे. तो एक उत्तम खेळाडू होता आणि माझ्याबद्दल आणि वरिष्ठ खेळाडूंबद्दल त्याला खूप आदर होता. आताही, मला दिसते की तो त्याच्या कामाबद्दल खूप उत्साही आहे,” असं सागंत गांगुलीने गंभीरला एकच वर्ष झाल्याने वेळ देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

“मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या जबाबदारीला अवघ्या एका वर्षाचा कालावधी झाला आहे आणि हा एक महत्त्वाचा (इंग्लंड) दौरा असेल. ऑस्ट्रेलियामध्ये त्याला थोडा संघर्ष करावा लागला, परंतु इतरांप्रमाणेच तो शिकेल, वाढेल आणि तो अधिक चांगला होईल,” असा विश्वास सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *