Maharashtra Weather : पुण्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा ; पहा कुठे कोणता अलर्ट?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जून ।। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या अंतर्गत भागात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोर धरला असून, हवामान खात्याने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होत आहे. यासोबतच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, पाकिस्तान ते बांगलादेश दरम्यान पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे.

कोकणात पावसाने हजेरी लावली असली तरी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात केवळ तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित भागात प्रामुख्याने उघाड राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. स्थानिक प्रशासनाने पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना नदीकाठ आणि डोंगराळ भागात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

ऑरेंज अलर्ट :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

येलो अलर्ट :

पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

येलो अलर्ट :

बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *