महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जून ।। इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी रात्री अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केलाय. या कारवाईनंतर आखाती देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक मुस्लिम देश (Muslim Countries) इराणच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेची चर्चा जोर धरू लागली आहे.
इराणच्या समर्थनात कोणते देश उभे राहिले?
सौदी अरेबिया, कतार, ओमान, इराक, पाकिस्तान आणि पॅलेस्टाईन यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या देशांनी इराणसोबत आपली एकजूट दाखवली असली, तरी लष्करी मदतीबाबत कोणतेही स्पष्ट आश्वासन दिलेले नाही. दरम्यान, सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, या परिस्थितीकडे गंभीरपणे पाहत संयम बाळगण्याचे आणि शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचे आवाहन केले आहे.
आखाती देशांच्या तीव्र प्रतिक्रिया
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हा संघर्ष विनाशाच्या दिशेने जात असून अमेरिकेच्या हल्ल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सर्व पक्षांनी संयमाने काम घ्यावे आणि संवादाच्या माध्यमातून मार्ग काढावा, असे त्यांनी सुचवले. ओमान आणि इराकनेही अमेरिका-इराण संघर्षावर चिंता व्यक्त करत अमेरिकेवर इराणला चिथावणी देण्याचा आरोप केला आहे. या कृतीचे परिणाम अधिक भयंकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तान आणि पॅलेस्टाईनचा रोष
पाकिस्ताननेही अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करत हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करणाऱ्या पाकिस्तानने रविवारी आपली भूमिका बदलली. पॅलेस्टाईनचा गट ‘हमास’ने देखील इराणच्या समर्थनाची घोषणा करत म्हटलं की, ‘आम्ही इराणसोबत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की इराण स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम आहे.’
रशिया-चीनची भूमिका काय?
इराणवर अमेरिकेने थेट हल्ला केल्यानंतर, रशिया आणि चीननेही आपली भूमिका स्पष्ट करत इराणच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, हे देश प्रत्यक्ष युद्धात उतरतील की लष्करी शस्त्रास्त्रांची मदत करतील, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
अमेरिका-इराण संघर्षाचे संभाव्य परिणाम
अमेरिकेने शनिवारी रात्री इराणची अणुक्षमता नष्ट केल्याचा दावा केला असून, इराणला आणखी हल्ल्यांचा इशाराही दिला आहे. अमेरिकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर इराण शांततेचा मार्ग स्वीकारत नाही, तर भविष्यात त्याच्यावर आणखी कडक कारवाई केली जाईल.
