महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जून ।। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारीसाठी निघालेला पालखी सोहळा रविवारी (ता. २२) रात्री माउलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा सासवड हद्दीत दाखल जाल्यानंतर चंदन टेकडीजवळ सासवड नगरपालिकेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिंडी प्रमुखास श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर हा सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळाकडे जाताना सोपाननगर कमानीजवळ सनदी अधिकारी राजेंद्र जगताप, माजी आमदार संजय जगताप यांच्यासह संत सोपानकाका सहकारी बँकेच्या संचालकांनी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, विणेकरी आणि माउलींच्या पालखी रथाचे स्वागत केले. पालखी तळावर आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप उपस्थित होते.
पालखी तळावर सोहळा दाखल होताच वारकऱ्यांनी रिंगण केले. मानाच्या २७ दिंड्यांच्या अभंगाचा आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी तळावर आल्यानंतर चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरली. हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली.
मंगळवारी (ता. २४) सकाळी सात वाजता पालखी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होणार असल्याची घोषणा चोपदारांनी केली. त्यानंतर पुन्हा माउलींच्या नावाचा गजर झाला आणि समाज आरती पार पडली. यानंतर वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावले.
सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील मोबाईल आणि इंटरनेट सुविधेत कमालीचा विस्कळितपणा आला होता. पालखी तळावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. माउलींचा पालखी सोहळा २२ व २३ जून असे दोन दिवस सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे.