फास्ट टॅग वार्षिक पासची १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी ; ‘या’ वेबसाइटवर मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जून ।। केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी तीन हजार रुपयांत वार्षिक पास देण्याची योजना आणली आहे. त्यात व्यावसायिक वाहने सोडून अन्य वाहनांसाठी हा निर्णय लागू असणार आहे. १५ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पण, ३६५ दिवसांत त्या वाहनांना २०० खेपा किंवा ट्रिप (हेलपाटे) करता येणार आहेत. प्रत्येक टोल क्रॉस झाला की एक हेलपाटा समजला जाणार आहे.

सध्या स्थानिक (लोकल) वाहनांसाठी महिन्याचा पास सवलतीत दिला जातो. ३३० रुपयांतील त्या पासमध्ये ते वाहन महिन्यात ५० हेलपाटे करू शकत होते. पण, आता तीन हजार रुपयांत २०० हेलपाटे करता येणार आहेत. दरम्यान, सध्या २०० खेपांसाठी प्रत्येक वाहनास सरासरी १० हजार रुपये मोजावे लागतात, आता या सवलतीच्या पास योजनेमुळे त्या वाहनधारकांना अवघे तीन हजार रुपयेच द्यावे लागणार आहेत. पण, एखाद्या वाहनाने एकाच महिन्यात राष्ट्रीय महामार्गावरील २०० टोल नाके पास केल्यास किंवा एक-दोन टोल नाक्यांवरून २०० हेलपाटे केल्यास त्यांचा तो सवलतीचा पास तेव्हाच संपणार आहे.

‘या’ वाहनांसाठी असणार सवलत; कोणत्या वेबसाइटवरून काढता येईल पास
स्थानिक वाहने आणि पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनांसाठी १५ ऑगस्टपासून तो सवलतीचा पास मिळणार आहे. वाहनधारकांना तो पास ‘एनएचआयडीसीएल’ या वेबसाइटवरून ऑनलाइन काढून घ्यावा लागणार आहे. तीन हजार रुपयांत २०० खेपांचा (ट्रिप) निर्णय व्यावसायिक वाहनांसाठी लागू असणार नाही. सध्या पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनांसाठी सवलतीचा पास मिळत नाही. त्या वाहनधारकांनाही १५ ऑगस्टपासून सवलतीचा पास मिळणार आहे.

टोल चुकवेगिरी थांबविण्यासाठी आगामी काळात ‘जीपीएस’ प्रणाली
महामार्गांवरून प्रवास करणारे अनेक वाहनधारक टोल नाक्यांवर पैसे द्यावे लागतात म्हणून जवळील दुसऱ्या मार्गाने जातात. काही अंतरावरून ते पुन्हा महामार्गावरूनच प्रवास करतात. हा प्रकार कायमचा बंद व्हावा, यासाठी आगामी काळात प्रत्येक वाहनांसाठी ‘जीपीएस’ प्रणाली बसविण्यात येणार असून त्याचे प्रात्यक्षिक सध्या सुरू झाले आहे. या प्रणालीमुळे जे वाहन जेवढा किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचा वापर करेल, तेवढे पैसे त्या वाहनाच्या फास्ट टॅगमधून आपोआप कपात होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *