महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जून ।। पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. परिणामी पालेभाज्यांचे दरात वाढ झाली होती. मात्र, या आठवडयात आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. तर, इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.
रोजच्या वापरातील टॉमेटो, बटाटा, कांदा, लसूण यांचे दर देखील कमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने रविवारी (दि. 22) बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत फळभाज्या, पालेभाज्यांचे दर कमी झाले होते. दोडका, वांगी, गवार, भेंडी, ढोबळी मिरची यांचे भाव स्थिर होते. बहुतांश भाज्या या सरासरी 30 ते 40 रुपये पावशेर होत्या. पावटा, गाजर, काकडी यांचे दर 80 ते 100 रुपये किलोच्या घरात होते. गेल्या आठवडयात पावसामुळे आवक काहीशी कमी झाली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली होती. तसेच, नागरिकही सकाळी खरेदीसाठी बाजारात आले होते. दरम्यान, पावटा, श्रावणी घेवडयाचे दर शंभरी पार झाले आहेत.
मोशी बाजारात या आठवडयात बटाटा, कोबी, टॉमेटो, मका, फ्लॉवरची आवक झाली आहे. मात्र, दरात घट झाली नव्हती. तसेच, कोथिंबीरची आवकही मोठया प्रमाणात झाली आहे. रविवारी तब्बल 39 हजार 800 जुडी पालेभाज्यांची आवक झाली. तर, 4 हजार 75 क्विंटल फळभाजांची आवक झाली होती.
पिंपरी बाजारातील दर पुढील प्रमाणे किलोमध्ये ः टॉमेटो 30 ते 40, भेंडी 50 ते 60, फ्लॉवर 60 , कोबी 40 , मिरची 70 ते 80, गाजर 40 ते 50, ढोबळी मिरची 80 ते 100 रुपये, दोडका 80, वांगी 80, कारले 70, बटाटा 30, श्रावणी घेवडा 100, पावटा 120, रताळे 60, लाल भोपळा 60, घोसाळे 60, तोंडली 80, दुधी भोपळा 40, वाटाणा 140, पापडी 40 असे दर होते. दरम्यान, पालेभाज्यांची आवक वाढल्याने कोथिंबीर, पालक, 20 रुपयांवर तर, मेथीची जुडीची किंमत 30 रुपये होती.
मोशी बाजारातील दर पुढीलप्रमाणे (क्विंटलमध्ये):
कांदा 14 ते 15, बटाटा 16, गवार 50 ते 60, टॉमेटो 12 ते 15, दोडको 60, काकडी 25 ते 30, कारली 40, गाजर 35 ते 40, कोबी 10, फलॉवर 15 ते 20, वांगी 40 ते 50, तोंडली 40, पावटा 80, शेवगा 35 ते 40, मटार 60, भेंडी 40 ते 50, दुधी भोपळा 35 ते 40, मका कणीस 12 ते 14 रुपये, तर कोथिंबीर 13 ते 15, मेथी 15 ते 16, शेपू 20, कांदापात 15, पालक 15.