महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। मुसळधार पावसामुळे निसरड्या झालेल्या जंगलवाटा आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कळसूबाई, रतनगड, अलंग, मदन, कुलंग आणि सांदण दरी येथे वर्षासहलीसाठी प्रवेशबंदी केल्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव येत्या १० ऑगस्टपर्यंत ही ठिकाणे पर्यटनासाठी बंद राहणार आहेत.
गेल्या काही वर्षांत नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड, सांदण दरीसह आजूबाजूच्या किल्ल्यांवर पुण्या-मुंबईतून जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. समाजमाध्यमांवर या ठिकाणांचे रील, व्हिडिओ आणि आकर्षक छायाचित्रे लोकप्रिय ठरल्याने सुट्टीच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक या किल्ल्यांवर जातात. मात्र तेथे काही दुर्घटना घडल्या असून त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘भंडारदरा वन परिक्षेत्रातील इतर पर्यटनस्थळे व निसर्गरम्य धबधबे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. अनियंत्रित पर्यटन रोखण्यासाठी या धबधब्यांवर दिवसभरात पाचशे पर्यटकांनाच प्रवेश मिळणार आहे. अभयारण्य क्षेत्रात मुक्कामासाठी येणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीननंतर प्रवेश मिळणार नाही,’ असे वन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पर्यटनासाठी खुल्या असलेल्या वनक्षेत्रांत धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास, रील्स करण्यास बंदी घालण्यात आली असून, अभयारण्यातील छायाचित्रीकरणासाठी वन विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या, पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे नाशिकचे उपनवसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.
बंदी कशासाठी ?
गेल्या महिनाभरात जोरदार पाऊस पडल्यामुळे सध्या जंगलवाटा निसरड्या झाल्या आहेत
धुक्यामुळे रस्ते चुकण्याची, अरुंद किंवा निमुळत्या रस्त्यांवर अपघात होण्याची शक्यता
दुर्मीळ वनस्पतीच्या संवर्धनासाठी किल्ला बंद
हरिश्चंद्रगडावर सह्याद्री क्रोटन (क्रोटन गिब्सोनियानस) ही दुर्मीळ वनस्पती आढळते. या वनस्पतीची नोंद १८० वर्षांनंतर अलीकडेच झाली आहे. जगाच्या पाठीवर ती केवळ याच भागात आढळते. कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड अभयारण्यात सह्याद्री क्रोटनची मोजकीच झाडे शिल्लक आहेत. ‘या वनस्पतीला वाचविण्यासाठी आम्ही संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. पर्यटकांमुळे धोका असल्याने संवर्धनामध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांना भटकंतीसाठी बंद ठेवणार आहोत,’ अशी माहितीही गजेंद्र हिरे यांनी दिली.