महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। राज्यातील सर्वांत श्रीमंत सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री. निळकंठेश्वर पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलचा धुव्वा उडाला असून, शरद पवार गटाच्या बळीराजा आणि शेतकरी कष्टकरी पॅनेलला सभासदांनी नाकारले.
बुधवारी सायंकाळी हाती आलेल्या निकालानुसार पवार यांच्या पॅनेलला 20 जागा आणि सहकार बचाव पॅनेलला चंद्रराव तावरे यांच्या रूपाने एक जागा मिळाली. अजित पवारांनी प्रतिस्पर्धी भालचंद्र देवकाते यांचा पराभव केला. हा निकाल मंगळवारीच जाहीर झाला. उर्वरित 20 जागांसाठीची मतमोजणी बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती. संथगतीने मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. बुधवारी पहाटे आक्षेप नोंदविल्याने मतमोजणी थांबविण्यात आली होती.
शरद पवारांचा एक डाव धोबीपछाड
शरद पवार यांनी प्रथम निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली. माळेगावमध्ये विरोधक नको महणून राजकीय मुत्सद्दीने डाव टाकून अजित पवार यांचे विरोधक संपविले. आम्ही सर्व एक हेच पुन्हा शरद पवार यांनी सिद्ध केले आहे.
तावरे गुरू-शिष्य नापास
चंद्रराव तावरे यांची सहकारातील राजकीय कारकीर्द मोठी आहे. यंदाच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे विजयी झाले. मात्र, 2020 च्या तुलनेत तावरे यांना कमी यश मिळाले. मागील वेळची कामगिरीसुद्धा त्यांना करता आली नाही. सहकार बचाव शेतकरी पॅनलचे खंदे नेतृत्व आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांना 593 मतांच्या फरकाने माळेगाव गटात धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. चंद्रराव तावरे वगळता सहकार बचावचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. शेतकऱ्यांविषयी कायम असहकाराची भूमिका घेतल्यामुळे तावरे गटाचा पराभव झाला आहे, असे तज्ञांना वाटते.
वयावरुन टोकलं, त्यांनीच रोखलं
सहकारमहर्षी म्हणून ओळख असणाऱ्या चंद्रराव तावरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत आपल्या पॅनेलचं प्रतिनिधित्व कारखान्यावर कायम ठेवलं आहे. खरं तर अजित पवार यांनी सातत्याने त्यांच्या वयाचा उल्लेख केला होता, 85 वर्षांचे झालात, आता तरी थांबणार आहात की नाही, असा सवाल त्यांनी विचारला होता. मात्र क्लीन स्वीप मारण्यापासून अजित पवारांचा वारु त्यांनीच रोखला.