महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारणार असून वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुणेकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे.
नव्या मार्गीकेमुळे शहरातील नागरिकांना पूर्व पश्चिम भाग, पिंपरी चिंचवड, हिंजवडी आयटी हबदरम्यान प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. नवी मेट्रो थेट वाघोली च्या पुढे विठ्ठलवाडी पर्यंत जोडण्यात येणार आहे त्यामुळे नगरमार्गावर होणारा वाहतूक कोंडीचा त्रास देखील कमी होईल.
कशी असणार नवी मार्गिका?
दोन्ही मार्गांची एकूण लांबी: १२.७५ किलोमीटर
वनाज ते चांदणी चौक लांबी: १.२ किलोमिटर
रामवाडी ते वाघोली/ विठ्ठलवाडी लांबी: ११.६३ किलोमिटर
प्रकल्पाचा अपेक्षित एकूण खर्च: ३६२४ कोटी
पूर्ण होण्यासाठी अंदाजे कालावधी: ४ वर्ष