महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार सुरु असून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. काही भागात मात्र पावसाने तात्पुरती उसंती घेतली आहे. आज २६ जून रोजी घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्यप्रदेश परिसरात समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ७.३ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आढळली आहे. या परिस्थितीमुळे कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अरबी समुद्र ते गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याच दरम्यान, मंगळवारी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
आज २६ जून रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यासह उर्वरीत विदर्भ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.