महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जून ।। गुगलने आपल्या सर्च प्लॅटफॉर्मवर आणखी एक मोठं पाऊल उचलत भारतात अधिक बुद्धिमान, संवादात्मक आणि दृश्यमाध्यम आधारित शोध अनुभव देणारा AI मोड अधिकृतपणे सुरू केला आहे. Search Labs अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा फिचर भारतातील वापरकर्त्यांना इंग्रजी भाषेत गुगल अॅप किंवा डेस्कटॉपवर वापरता येणार आहे.
जेमिनी 2.5 वर आधारित
AI मोड ही सेवा Gemini 2.5 या प्रगत AI मॉडेलद्वारे समर्थित आहे, जे वापरकर्त्यांना अधिक गुंतागुंतीचे आणि सखोल प्रश्न विचारण्याची मुभा देते. या प्रणालीचा वापर करून गुगल वापरकर्त्याच्या प्रश्नाचे उप-प्रश्नांमध्ये कम्बाइन करून अधिक अचूक आणि संदर्भयुक्त माहिती शोधते. यामुळे केवळ साधे शोधच नव्हे तर प्रवास नियोजन, उत्पादन तुलना किंवा ‘कसे करावे’ या स्वरूपातील प्रश्नांची उत्तरे अधिक प्रभावीपणे दिली जात आहेत.
गुगलच्या माहितीनुसार, याअंतर्गत वापरकर्ते पूर्वीपेक्षा 2-3 पट लांब प्रश्न विचारत आहेत. यामुळे AI मोडचा वापर केवळ शोधासाठी नव्हे, तर समस्या सोडवण्यासाठी एक स्मार्ट सहकारी म्हणून होऊ लागला आहे.
भारतासाठी खास व्हॉइस आणि व्हिज्युअल सर्च
भारतामधील वापरकर्ते व्हॉइस सर्च आणि Google Lens चा सर्वाधिक वापर करणाऱ्यांमध्ये असल्यामुळे गुगलने याला लक्षात घेऊन AI मोडमध्ये व्हॉइस आणि इमेज इनपुट अधिक सुलभ केले आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या झाडाचा फोटो घेऊन “हे झाड कसं वाढवायचं?” असा प्रश्न विचारल्यास, AI त्या वनस्पतीची ओळख करून देऊन योग्य निगा राखण्याच्या सल्ल्यांसह उत्तर देतो.
ही मल्टीमोडल क्षमता (म्हणजे मजकूर, आवाज आणि फोटो) भारतातील विविध भाषिक आणि डिजिटल पार्श्वभूमी असलेल्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे.
वेबवरील दर्जेदार माहितीचा सखोल अभ्यास
AI मोडचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, हे फीचर वापरकर्त्यांना विविध दृष्टीकोनातून विषय समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करतं. AI उत्तरे देताना विश्वासार्हता जास्त असल्यास AI निर्मित उत्तर दिलं जातं, अन्यथा पारंपरिक शोध निकालही दाखवले जातात. यामुळे सर्च अनुभव अधिक संतुलित, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह ठरतो.
AI मोड सध्या प्रायोगिक स्वरूपात भारतात सुरू करण्यात आला असून, यामार्फत गुगल वापरकर्त्यांचे अभिप्राय गोळा करून सिस्टममध्ये सुधारणा करत आहे. जगभरात सुमारे 1.5 अब्ज लोकांनी AI Overviews वापरायला सुरुवात केली असून, भारतात देखील यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
गुगलच्या मते, हा AI मोड भविष्यातील शोधाचा पाया ठरेल, जिथे माहिती केवळ मिळवणे नव्हे, तर त्याचा अर्थ लावणे, विश्लेषण करणे आणि निर्णय घेणे यासाठी वापरली जाईल.