Monsoon 2025: मान्सूनने व्यापला संपूर्ण देश; राज्यात 5 जुलैपासून वेग घेण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। यंदा मान्सूनने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढत सर्व राज्ये विक्रमी वेळेत पादाक्रांत केली. संपूर्ण देश व्यापण्याची तारखी ही 8 जुलै आहे. मात्र, यंदा नऊ दिवस आधीच 29 जून रोजी मान्सूनने अवघा देश व्यापला आहे. दरम्यान, राज्यात मान्सून 5 जुलैपासून वेग घेईल, तोवर मध्यम पावसाचा अंदाज आहे.

नैऋत्य मान्सूनने रविवारी (दि.29 जून) राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या उर्वरित भागासह आणि संपूर्ण दिल्ली काबिज केली. अशाप्रकारे त्याने 8 जुलै या सामान्य तारखेपेक्षा नऊ दिवस आधीच 29 जून रोजी संपूर्ण देश व्यापला आहे. त्यामुळे लवकरच तो हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होऊन संपूर्ण देशाला पाऊस देईल. राज्यात 5 जुलैपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला प्रारंभ होईल, असा अंदाज आहे. (Latest Pune News)

गेल्या 24 तासांतील पाऊस
कोकण : माथेरान 54, कर्जत 50, तलासरी 45, सावंतवाडी 41, लांजा 38, डहाणू 35, मोखेडा 34, पेण 31, पालघर 30, खालापूर 30, मुल्दे 29, विक्रमगड 28, मुरबाड 28, उरण 26, कुडाळ 25, पनवेल 24, आवळेगाव 24, सांगे 22, वाडा 20, श्रीवर्धन 20, राजापूर 20, मंडणगड 20, रोहा 19, संगमेश्वर देवरूख 19, तळा 19, पेडणे 18, पाली 17, खेड 17, अंबरनाथ 17, उल्हासनगर 16.

मध्य महाराष्ट्र : शाहूवाडी 72, राधानगरी 50, पेठ 42, र्त्यंबकेश्वर 39, गगनबावडा 36, महाबळेश्वर 23.

घाटमाथा : शिरगाव 60, ताम्हिणी 50, अंबोणे 47, कोयना (नवजा) 46, लोणावळा 43, लोणावळा 40.

सात दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 29 जून ते 2 जुलै या कालावधीत अतिमुसळधारेचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा यासह मराठवाड्यातही मुसळधार पावासाला सुरुवात होईल. 5 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. हवेचे दाब राज्यात 5 जुलैनंतर अनुकूल होतील, त्यानंतरच मोठ्या पावसाचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *