पंढरपुरात व्हीआयपी दर्शनासंदर्भात मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. किंबहुना आषाढीआधीच काही भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या नगरीत होणारी गर्दी आणि सामान्य भाविकांना प्राधान्यस्थानी ठेवत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासंदर्भात एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी गजबजली आहे. हजारो भाविक आषाढी एकादशी दिवशी दर्शन मिळत नसल्याने आत्ताच दर्शन घेऊन पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. दर्शन रांगेत भाविकाना अनेक सुविधा यंदा देण्यात येत आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी रांगेत हजारो भाविक असताना व्हीआयपी दर्शन दिल्यास कारवाई होणार असल्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शनास सोडल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहेय. व्हीआयपी दर्शन संख्या वाढली की दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते, त्यामुळेच हा आदेश काढण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकानुसार अनेकदा नियमित प्रवेशद्वारातून काही भाविकांना न सोडता इतर प्रवेशद्वारांतून दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा उभा राहतो. याच धर्तीवर सामान्य भाविकांना समानतेनं आणि शांततेनं दर्शन दिलं जाणं आवश्यक असल्याची बाब अधोरेखित करत कोणत्याही अन्य मार्गानं दर्शन देण्यात येऊ नये असा स्पष्ट सूचना देत आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा जारी करण्यात आला आहे.

वारकऱ्यांचा सोहळा विठुरायाच्या समीप…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी आता विठुरायाच्या समीप येत आहेत. जिल्हा प्रशासनाने वारीसाठी तयारी पूर्ण करण्यात आलीये. तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज इंदापूरहून सराटीकडे मार्गस्थ झाला आहे. इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा आज दुपारी वडापुरी, सुरवड, वकिलवस्ती आणि बावडा अशा गावांमधून मार्गक्रमण करत संध्याकाळपर्यंत सराटी येथे दाखल होणार आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झालंय. यावेळी शेकडो मैल दूरवरून आलेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *