कोकणासह राज्याच्या ‘या’ भागांना पाऊस झोडपणार ; पहा हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। मान्सूननं महाराष्ट्रात प्रवेश केल्या क्षणापासूनच राज्याच्या पश्चिम घाट क्षेत्रामध्ये समाधानकारक पर्जन्यमान पाहायला मिळालं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तुलनेनं पावसाची हजेरी कमी असल्याचं दिसून आलं. मात्र आता तिथंसुद्धा मान्सूनच्या या वाऱ्यांनी धडक दिली असून, यंदा राज्याप्रमाणंच सबंध देशभरातही पावसानं वेळेआधीच आपली हजेरी दाखवून दिली आहे.

8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापणारा मान्सून यावेळी जूनच्या अखेरीस देशभरात पोहोचला. तिथं उत्तरेकडील राज्यांमध्ये तर मान्सूननं थैमानही घातलं. नद्यांना आलेल्या पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं. तर, इथं महाराष्ट्रातही कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे.

हवामान विभागानं गेल्या काही दिवसांच्या हवामान प्रणालीच्या धर्तीवर वर्तवण्यात आलेल्या अंदाजान्वये कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे. तर, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा थरार पाहायला मिळणार आहे.

कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार
हवामान खात्याच्या निरिक्षणानुसार बंगालच्या उपसागरातून वायव्य दिशेला मान्सून वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून, त्यांची दिशा आणखी पुढे सरकरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी पुढील चार ते पाच दिवस कोकणासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी राज्याला कोणताही अलर्ट नसला तरी बुधवारी मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथं प्रामुख्यानं घाटमाथ्यावरील परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यानंतर गुरुवारी रायगड, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील परिसरांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशभरातील हवामानाचा आढावा…
पुढील 24 तासांमध्ये देशाच्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, झारखंड आणि गुजरातच्या पूर्व भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गोव्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं दक्षिण भारतात कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, केरळ, तामिळनाडू इथंही मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार असलं तरीही नद्यांना आलेल्या उधाणामुळं मात्र जनजीवन विस्कळीत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *