महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुलै ।। सध्या संपूर्ण जगात ५ जुलै या तारखेबाबत भीतीचं वातावरण पसरलंय. याचं कारण म्हणजे जपानी मंगा आर्टिस्ट रियो तात्सुकी यांच्या 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या मंगा पुस्तकातली एक धक्कादायक भविष्यवाणी. जपानचे बाबा वेंगा म्हणजेच तात्सुकी यांनी आपल्या पुस्तकात दावा केला होता की, ५ जुलै रोजी जपानमध्ये एक भयानक त्सुनामी येईल, जी २०११ मध्ये आलेल्या तोहोकू आपत्तीपेक्षाही अधिक विध्वंसक ठरू शकते.
जपानचे ‘बाबा वेंगा’
रियो तात्सुकी यांना ‘जपानी बाबा वेंगा’ असं म्हटलं जातं. त्यांच्या मंगा कॉमिक्समधून त्यांनी अनेक गोष्टींची अगोदरच भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये कोरोना व्हायरस, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि २०११ चा भूकंप-सूनामी यांसारख्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. त्यामुळे लोक त्यांच्या भविष्यवाण्यांचा गांभीर्याने विचार करतात. जरी या भविष्यवाण्या मंगामधून मांडल्या गेल्या असल्या, तरी त्या काही वेळा अचूक ठरल्या आहेत.
बाबा वेंगानी दिले त्सुनामीचे संकेत
तात्सुकी यांच्या मते, मोठी सूनामी येण्यापूर्वी समुद्रात काही विशेष बदल होतात. यामध्ये समुद्राच्या पाण्यात उकळ्यासारखा प्रकार दिसतो. याशिवाय त्यामध्ये एका वेगळ्या प्रकारचे बुडबुडे निर्णाम होतात. इतकंच नाही तर जोरदार कंपनंही जाणवतात. सध्या जपानच्या दक्षिणेकडील बेटांमध्ये भूकंपांचं प्रमाण वाढलं आहे, ज्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे.
अकुसेकिजिमा बेटावर भूकंप
५ जुलैच्या सूनामीच्या भविष्यवाणीच्या पार्श्वभूमीवर, टोकारा बेटसमूहातील अकुसेकिजिमा बेटावर भूकंपांची एकामागून एक मालिकाच सुरू आहे. २१ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत याठिकाणी तब्बल ७३६ भूकंपांची नोंद झाली आहे. बहुतांश झटके तीव्रता ३ ते ५ या स्केलवर होते, पण काही इतके जोरदार होते की घरातील वस्तू खाली पडल्या.
अकुसेकिजिमा बेट हे समुद्रसपाटीपासून १५० मीटर उंच असून ज्वालामुखीय बेट आहे. यापूर्वी याठिकाणी त्सुनामीचा धोका कमी मानला जात होता. मात्र आता इतक्या मोठ्या प्रमाणात भूकंप होत असल्याने मोठ्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता अधिक वाढली आहे.
लोकांमध्ये भीतीचं वातावरण
तात्सुकी यांच्या भविष्यवाणी आणि भूकंपांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक लोक घाबरून गेलेत. किनारी भागांमध्ये लोकांनी प्रवास करणं बंद केलं आहे. अनेकांनी आपल्या फ्लाइट्सची तिकीटंही कॅन्सल केली आहेत. स्थानिक प्रशासनाने देखील काळजी घेत आपत्कालीन यंत्रणांना सतर्क केलं आहे.
अकुसेकिजिमा गावातील ६० वर्षीय इसामु सकामोटो म्हणतात, “इतके भूकंप झाल्यावर असं वाटतं की जमिनीखाली काहीतरी मोठं घडतंय. जमिनीमध्ये सतत हादरे जाणवतात. जर खरंच मोठा भूकंप आला, तर इथं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. या वेळेस भीती वाटते खरी!”
वैज्ञानिकांचं बारीक लक्ष
जपानमधील वैज्ञानिक आणि सरकारी यंत्रणा या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. जनतेला सतत मार्गदर्शन केलं जातंय. यामध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावरून पसरवण्यात येणाऱ्या कोणत्याही अप्रामाणिक माहितीकडे दुर्लक्ष करा आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवा, असं सांगितलं जातंय.