महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुलै ।। मराठी कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) आता पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यात एक मोठा बदल झाल्याचे समोर आले आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सूत्रसंचालनाची धुरा निलेश साबळेने (Nilesh Sable) सांभाळली होती. मात्र आता ‘चला हवा येऊ द्या 2’मधून (Chala Hawa Yeu Dya 2 ) निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. ‘चला हवा येऊ द्या 2’ सूत्रसंचालनल मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) करणार आहे.
निलेश साबळेच्या ‘चला हवा येऊ द्या 2’ मधील एक्झिटनंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये (Sharad Upadhyay) यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टच्या माध्यमातून शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेला खडेबोल सुनावले आहे. तसेच आपल्या वाट्याला आलेला वाईट अनुभव देखील सांगितला आहे.
शरद उपाध्ये यांची पोस्ट
“आदरणीय निलेशजी साबळे,
आज पेपरमध्ये आपल्याला ‘चला हवा येऊ द्या 2’मधून डच्चू देऊन त्याजागी अभिजीत खांडकेकरला आणल्याची बातमी वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य वाटले नाही. कारण तू एकदा मला फोन केलास आणि शोसाठी 11 वाजता बोलावलेस. मी वेळेवर आलो. पण ३ वाजेपर्यंत कोणीही त्या खोलीत फिरकले नाही. मला कोणी पाणी देखील दिले नाही. मला खोली सोडू नको असे सांगण्यात आले होते
निलेश तू इतर कलाकारांच्या खोलीत जाऊन गप्पा मारत होता. पण माझ्या खोलीत थेट 4 वाजता आलात. तू मला स्माइल न देता स्टेजवर गेला. इतरांचे शूट खूप वेळ झाले आणि माझे मात्र मला 6 वाजता बोलावून फक्त 15 मिनिटांत घाईत माझे शूट आटोपलेस. त्यामुळे माझा संपूर्ण दिवस वाया गेला. एडिटींगमध्ये माझे उत्तर देखील ती कापलीस. जेव्हा आपण बाहेर भेटलो तेव्हा वडिलांच्या नात्यानं तुला काही सल्ले दिले. मात्र तू कार्यक्रमाचा प्रमुख असल्यामुळे तुझ्या डोक्यात हवा होती.
तुझा स्वभावात निष्काळजीपणा आहे. अहंकार अतिवाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एक पोस्ट मिळाली की आपल्याला गर्व यतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तू सगळ्या लोकांना आपलेसे केले नाही. कार्यक्रमही चांगले होत नव्हते. म्हणून चॅनेलने तुला बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मैत्रीपूर्ण असावा. सर्वांची काळजी घ्यावी आणि एकत्र काम करावे म्हणजे कार्यक्रमाची चर्चा होते.
अभिजीत खांडकेकर ‘चला हवा येऊ द्या 2’ ची धुराळा चांगली सांभाळतील. मी त्यांचे काम पाहिले आहे. तुम्ही अनुभवी आहात. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीमध्ये तुमच्याविषयी झालेला गैरसमज कामाने दूर करा. देव तुम्हाला चांगली बुद्धी देवो!”
शरद उपाध्ये यांच्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र अद्याप यावर निलेश साबळेची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.