महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जुलै ।। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित कोकण, नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिक घाटमाथ्यावर येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. राज्यातील उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात ‘ऑरेंज’ अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढणार असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गंगेचा पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशालगतच्या परिसरावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता झारखंड आणि शेजारील भागांवर स्थिरावलेला आहे. त्यासोबत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील २४ तासांत हळूहळू पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
गेल्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झालीय. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावलीय. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून बुधवारी सकाळपर्यंतच्या सोलापूर आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३२ अंश तापमानान नोंदवण्यात आलंय.