केंद्रीय गृहमंत्री शहा आज पुणे दौऱ्यावर; वाहतुकीत मोठे बदल, काही शाळांना सुट्टी, तर काहींच्या वेळेत बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, शुक्रवारी (चार जुलै) पुणे दौऱ्यावर येत असल्याने, त्यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर काहींनी आपल्या वेळेत बदल केला आहे.

मुलांच्या सुट्टीमुळे पालकांनाही आपल्या नियोजनात बदल करावा लागला आहे. त्याचप्रमाणे खासगी आस्थापना आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो.

गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शुक्रवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आहे. या वेळी ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , कोंढवा बुद्रुक, खडी मशिन चौक आणि वडाची वाडी परिसराला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळितपणे सुरू राहण्यासाठी वाहतूक शाखेने बंडगार्डन, काळेपडळ, कोंढवा आणि भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत आज, शुक्रवारी वाहतुकीत तात्तुरत्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत आज दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत संबंधित विभागांमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केले आहेत.

या बदलांचा फटका शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस आणि व्हॅन यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेत येता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन काही शाळांनी शाळेला सुट्टी देत, ऑनलाइन पद्धतीने वर्ग भरवणार असल्याचे जाहीर केले आहे. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांनी शाळेला दीड ते दोन तास लवकर सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन वेळी झालेल्या या बदलांमुळे पालकांनाही आपल्या नियोजनात बदल करावा लागला आहे.

शहांच्या दौऱ्यामुळे वाहतूक बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (चार जुलै) शहर वाहतूक विभागाने कात्रज ते मंतरवाडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक आणि कात्रज चौक या दरम्यान मालवाहतूक करणारी वाहने, डंपर, मिक्सर, ट्रक, जड व अवजड वाहने; तसेच स्लो मुव्हिंग वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

याशिवाय, बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीत, मोर ओढा ते सर्किट हाउस चौक ते आयबी चौक या मार्गावर एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस रस्त्यांवर तैनात राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *