महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. तर काही जिल्ह्यांत अद्याप म्हणावा तसा पाऊस पडला नाही त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात तुफान पाऊस पडत असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात उर्वरित ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे आणि हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे ते आपण जाणून घेणार आहोत….
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल. मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर आजपासून पुढचे ५ दिवस महत्वाचे राहणार आहेत कारण या ठिकाणी तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आजपासून कोकणामधील सर्वच जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भात आज काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.