महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नव्याने मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार शंभर युनिट वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) दरमहा १२.७६ रुपयांनी कपात होणार आहे. तीनशे युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल जवळपास दरमहा २४५ रुपयांनी; तर पाचशे युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल दरमहा जवळपास ५०६ रुपयांनी वाढणार आहे.
आयोगाने नुकतीच महावितरणच्या पुढील पाच वर्षांसाठी वीजदर निश्चितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एक जुलैपासून नवे वीजदर लागू झाले आहेत. मात्र, त्यानंतरची सलग चार वर्षे शंभर ते पाचशेहून अधिक युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल कमी होणार आहे. परंतु, या प्रस्तावानुसार शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी यावर्षी त्यापुढील विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना मोठा भुर्दंड बसणार आहे.
वीजतज्ज्ञांच्या मदतीने या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर दोनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात जवळपास तीन हजारांनी; तर पाचशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांच्या वीजबिलात यावर्षी सहा हजार रुपयांहून अधिक वाढ होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे इंधन समायोजन आकार लागू केला जातो. त्यामुळे वीजबिलाचे गणित करताना ते विचारात न घेता गणित मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वीजबिल कमी-जास्त होऊ शकते.
जुन्या वीजदरानुसार ५०० युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना दरमहा वीजबिल स्थिर आकार, वीज आकार, १६ टक्के वीज शुल्क, वीजवहन आकार आणि इंधन समायोजन आकार एकत्रित करून दरमहा ७,१३६.३२ रुपये बिल येत होते. तेवढेच युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता आयोगाच्या निर्णयानुसार दरमहा ७,६४३.२४ रुपये वीजबिल येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरमहा बिलात ५०६.९२ रुपयांनी; तर वार्षिक बिलात ६,०८३.०४ रुपयांनी वाढ होणार आहे.