![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मार्च २०२६ ।। आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या धुरळ्याची झळ आता थेट मुंबईच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागली आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने मुंबईतील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शहरातील सुमारे २० टक्के हॉटेल्सना कुलूप लावावे लागले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या तीन दिवसांत हा आकडा थेट ५० टक्क्यांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हॉटेल उद्योगासाठी गॅस हा स्वयंपाकघराचा कणा मानला जातो. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल्सना कामकाज थांबवावे लागले आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहकांनाही याचा थेट फटका बसत असून अनेक भागांत हॉटेल्स बंद असल्याने जेवणासाठी पर्याय कमी पडू लागले आहेत.
दरम्यान, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. बेंगळुरूसह काही शहरांतही पुरवठा कमी झाल्यानंतर आता त्याची तीव्रता मुंबईत जाणवू लागली आहे. ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ (AHAR) चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस पुरवठा तातडीने सुरळीत झाला नाही तर मुंबईतील हॉटेल उद्योग गंभीर संकटात सापडू शकतो. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून व्यावसायिक गॅसचा पुरवठा नियमित करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

